‘सुप्रिया सुळेंसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीने चॅनेल मधील मुलींच्या कपड्यांवर बोलणे अजिबातच शोभत नाही’

पुणे – शिवप्रतिष्ठान संघटनेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी टिकली लावली नसल्याने एका महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला होता. संभाजी भिडेंनी यावेळी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं असून, त्यावर टीका होत आहे.

‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आझाद मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणतात, अहो सुप्रियाताई ,चॅनलमधील मुली का बरं साडी घालतील त्यांना थोडीच  मी कशी तुमच्यातली आहे हे जनतेला दाखवण्यासाठी साडी नेसून मतं मागायची आहेत?

खरंतर सुप्रिया सुळेंकडून असे विधान येणे निश्चितच आश्चर्यकारक आहे, त्या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत आणि संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्या मुलींना जेव्हा सणावाराला वाटते की साडी नेसावी तेव्हा त्या नेसतात. किंवा जरी सणवारालाही शर्ट आणि ट्राउजर घातले आणि साडी नाही नेसली तरी काही खूप फरक पडत नाही.

भिडे गुरुजी वयाने मोठे आहेत त्यामुळे टिकली संदर्भातील त्यांचे विधान आम्ही समजू शकतो परंतु सुप्रिया सुळेंसारख्या स्वतः मॉड राहणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या जबाबदार लोकप्रतिनिधीने चॅनेल मधील मुलींच्या कपड्यांवर बोलणे अजिबातच शोभत नाही. असं त्या म्हणाल्या आहेत.