‘उद्धव ठाकरे यांची दहशत आहे, त्यामुळे  मनसे,भाजप,शिंदे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येतील’

मुंबई – शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय.  मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच व्यासपीठावर शुक्रवारी दिसून आले होते. शिवाजी पार्कवर मनसेच्या झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमात तीन नेते एकत्र आल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका असं या तिन्ही नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरीही या भेटीने महाविकास आघाडीतील नेत्यांना मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना तिनही नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे, त्यामुळे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येतील असं दानवे यांनी म्हटलं आहे.

तसेच या  तिघांना लोक मोठे नेते का म्हणतात हेच मला कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक जण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपण याला गद्दारी म्हणतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. दरम्यान एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचं का असा सवाल दानवे यांनी केला आहे.