जर कसबा भ्रमातून बाहेर पडू शकत असेल, तर देश बाहेर पडायला काहीच अडचण नाही- उद्धव ठाकरे

पुणे- कसब्यात २८ वर्षांनंतर भाजपाच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या कसब्यातील या मोठ्या विजयानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. अशातच कसब्यामध्ये पोटनिवडणूक जिंकल्यानंतर मला आनंद नक्कीच झाला आहे. एवढ्या वर्षांच्या एका भ्रमातून कसबा मतदारसंघ जर बाहेर पडत असेल, तर देश बाहेर पडायला काहीच अडचण नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) लगावला आहे.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनोज पर्रीकरांचे उदाहरण दिले. टिळकांच्या घराण्याचा वापर करून भाजपाने त्यांना बाजूला करून टाकलं. तो राग मतदारांच्या मनात होता. गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. त्यांचा फोटो मी पाहिला की ऑक्सिजनच्या नळ्या लावून त्यांना प्रचाराला आणलं. मनोहर पर्रीकरांकडूनही तसाच प्रचार करून घेतला, पण त्यानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली होती, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.