उद्धव ठाकरे यांना 1996 सालीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याने केला गौप्यस्फोट 

बीड – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत(Uddhav Thackeray) एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सुरेश नवले(suresh nawale) यांनी हा दावा केला असून  उद्धव ठाकरे यांना 1996 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होते असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी  केला आहे.

1996 साली उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. आणि उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे असा आग्रह केला असल्याचं ते म्हणाले. या सांगण्यामागचे मुख्य सूत्रधार हे देखील उद्धव ठाकरेच होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

माजी मंत्री सुरेश नवले हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामिल झाले आहेत. ते म्हणाले की, 1996 पासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला, त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली.  मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची अतृप्त इच्छा महाविकास आघाडी सरकार मध्ये पूर्ण झाली असा टोला देखील नवले यांनी लगावला.