प्रकाश आंबेडकर यांचे उदयनिधी यांना समर्थन; म्हणाले, “सनातन म्हणजे…”

Udhayanidhi Sanatana Remarks:  INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून सनातनचा अर्थ एका शब्दांत सांगितला आहे. सनातन म्हणजे छुआछूत (अस्पृशता) असं ते म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी कोणाचे नाव न घेता ही पोस्ट केली आहे. पण, सध्या सनातन या शब्दावरुन सुरु असलेला गोंधळ पाहता त्यांनी उदयनिधी यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी?
एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.उदयनिधीने शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.’ असं वक्तव्य करत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.