मराठा मोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेस आमदारांना आंदोलकांनी हुसकावून लावलं; जोरदार राडा झाला 

Maratha Arakshan Andolan:  जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. याचे पडसाद नांदेड जिल्ह्यात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोको, मोर्चे काढून आंदोलन केले जात आहे. तर राजकीय नेत्यांबद्दल आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या रोषाचा सामना नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांना करावा लागला आहे. कारण मोर्चात सहभागी झालेल्या या दोन्ही आमदारांना आंदोलकांनी अक्षरशः हुसकावून लावले. आंदोलकांचा वाढता रोष पाहता आमदारांनी देखील तेथून काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँगेसचे विधानपरिषद सदस्य अमर राजूरकर हे घोषणा देत मोर्चात सहभागी झाले. पण त्याचवेळी मोर्चेकऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्यासमोर प्रचंड घोषणा देण्यात आल्या. एवढंच नाही तर काही तरुण अमर राजूरकर यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणांना अडवले आणि आमदार अमर राजूरकर यांना सुखरूप बाहेर काढले.

विशेष म्हणजे, असाच काही प्रकार काँगेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासोबत देखील घडला. मोहन हंबर्डे मोर्चात सहभागी होताच त्यांना देखील विरोध करण्यात आला. ‘चले जाव, चले जाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. तरुणाचा संताप पाहून हंबर्डे यांनी मोर्चातून काढता पाय घेतला. त्यामुळे या दोन्ही घटनांची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –