गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल; दरेकरांचे शिवसेनेतील नेत्यांना आवाहन

ठाणे : भाजपने शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. शिवसेना ही पहिल्यासारखी राहिली नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली. वर्तकनगर येथील भीमनगर भागात भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

शाखा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे, मात्र आज तेच शिवसैनिक नाराज असून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना साधे नगरसेवकाचे तिकीट मिळाले नाही. परंतु भाजपने मला पक्षात घेऊन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते पद दिले. त्यामुळे गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल, अशी मिश्किल टिपणी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले.

मराठी माणसाला शिवसेनेने वाऱ्यावर सोडले असून त्यांची काळजी शिवसेनेला राहिली नाही. त्यामुळे मराठी माणसाला भाजपशिवाय पर्याय नाही, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री-ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे एकमेकांवर टीका करतात. पण ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. तसेच मालमत्ता करमाफीचे गाजर दाखवले जात आहे, असेही दरेकर म्हणाले.