या लोकांना काय हक्क आहे आमची बदनामी करण्याचा?, दिशा सालियनच्या आईचा थेट सवाल 

 मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान हिने आत्महत्या केली नसून तिची बलात्कारानंतर हत्या झाली होती. हे सर्व घडत असताना कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक बाहेर उभे होते, हेही लवकरच कळेल, यासंबंधीची चौकशी लवकरच होईल, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा आरोपांची राळ उठवली आहे. तर आमदार  नितेश राणे यांनीदेखील दिशा सालियान हिच्या घराबाहेर एक काळी मर्सिडीज दिसते. तशीच एक मर्सिडीज सचिन वाझेंकडेही आहे. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकारण तापले असताना आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी या राजकारामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया दिशाच्या आईने दिली आहे.माझी मुलगी गेली आहे. त्याचे दुःख आम्ही सहन करत आहोत. पण या लोकांना काय हक्क आहे आमची बदनामी करण्याचा?, असा सवाल दिशा सालियनच्या आईने केला.

आम्ही दोन वर्षापूर्वीच या प्रकरणाची माहिती दिली होती. तरीही हे सर्वजण पुन्हा तेच आणत आम्हाला त्रास देत आहेत. या राजकारामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आम्ही रोज मरत आहोत. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. या लोकांमुळे आम्हाला जगावे असं वाटत नाही. आमचे जर काही झाले तर हे लोकच जबाबदार असतील, असा इशारा दिशा सालियाच्या आईने दिला आहे.

दरम्यान, ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या पालकांनी माध्यमांना सांगितले. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितले होते. त्या तणावात ती होती असेही पालकांनी सांगितले. आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत अशी खंतही दिशा सालियनच्या आईने व्यक्त केली. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून बदनामी का करत आहात, असा प्रश्नही दिशाच्या आईने उपस्थित केला.