नोकरीची चिंता मिटणार : राज्यसरकारच्या ‘या’ विभागात होणार मेगाभरती

मुंबई : वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार बोलत होते.

राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरु करण्यात आली आहे असेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधी सूचनेमध्ये विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला होता.

तर, दुसरीकडे पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली.