‘जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे… अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत..’

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी महाराष्ट्र उपाध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांचे पक्षात स्वागत केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी अजितदादा म्हणाले की, रुपालीताई यांचा राजकीय प्रवास मागील अनेक वर्षांपासून पाहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करताना अनेक सामाजिक प्रश्नांवर लक्ष दिले आहे. पण मनसे पक्षाने दुजाभाव करत त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले. गर्भवती असतानाही त्यांनी मनसे पक्षाचा प्रभाव पुणे शहरात वाढविण्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेतल्या होत्या. पण त्यांच्या उल्लेखनीय कामाला डावलले गेले.

राष्ट्रवादीत रुपाली पाटील याचं जंगी स्वागत झालं असलं तरी आता रुपाली पाटील यांचे एकेकाळचे खास सहकारी आणि मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी रुपाली पाटील यांच्या पक्ष सोडण्याबाबत भाष्य केले आहे. ‘जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे.. अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत..’ या आशयचे ट्विट करत नगरसेवक साईनाथ बाबर आणि वसंत मोरे अजूनही राज ठाकरेंसाठी खंबीर उभे असल्याचं वसंत मोरे म्हणालेत.