कतरिना कैफला घटस्फोट देणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर विकी कौशल म्हणाला…

मुंबई- अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलीवूडमधील सर्वात क्यूट कपल्सपैकी एक आहे. त्या दोघांमधील प्रेम, त्यांचे एकमेकांतील बॉन्डींग याची नेहमी सोशल मीडियावर चर्चा होत असते. अशातच आता विकीने कतरिना घटस्फोट (Vicky Kaushal On Divorce With Katrina Kaif) देण्याच्या प्रश्नावर लक्षवेधी उत्तर दिले आहे.

अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईतील एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला. यावेळी सारा अली खान आणि विकी कौशल दोघंही उपस्थित होते. ट्रेलर लाँच झाल्यानंतर दोघांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. यावेळी विकी कौशलला त्याची पत्नी कतरिना कैफसोबत घटस्फोटाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विकीने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत आहे.

“जर तुला कतरिना कैफपेक्षा चांगली दुसरी कोणती अभिनेत्री भेटली तर तू तिला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करशील का”, असा प्रश्न एका पत्रकाराने विकीला विचारला. यावर आधी विकीला खूप हसू आलं. त्यानंतर तो म्हणाला, “सर.. मी आता बच्चा आहे. आधी मला नीट मोठं तरी होऊ द्या. तुम्ही असे प्रश्न विचारत आहात, मी तर अजून लहान आहे. संध्याकाळी मला घरीसुद्धा जायचं आहे. अशा विचित्र प्रश्नांचं उत्तर मी कसं देऊ?” त्यानंतर तो प्रश्नाचं उत्तरसुद्धा देतो आणि म्हणतो, “जन्मा-जन्मांपर्यंत.” म्हणजेच विकी अनेक जन्मांपर्यंत कतरिनाची साथ देणार आहे. त्याच्या उत्तराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.