‘मद्य’रात्री भाजपा नेता बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर, राऊतांनी पुढे आणला व्हिडिओ; चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असतात. मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोहित कंबोज यांचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आणत खळबळ माजवली आहे. संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता मद्यधुंद अवस्थेत मुलींसोबत नाचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ पुराव्यासाठी वापरत मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन कांबळे व्हिडिओत सांगताना दिसत आहेत की, “मोहित कंबोज हे मध्यरात्री साडे तीन वाजता बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत.”

सचिन कांबळे यांचा हा व्हिडिओ ट्वीटमध्ये जोडत संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना प्रश्न केला आहे की, “महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे.. भाजपचे हिंदुत्व येथे काय करीत होते?cc tv footej लगेच ताब्यात घ्या. खोक्यांचे राज्य हे अमली पदार्थांचे राज्य होऊ नये.”

यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रेडिओ बारमधील दृश्य दिसत आहेत. “पहाटे ३.३०, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत.. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत.. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे”, असं ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे.