मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपला – रवींद्र धंगेकर 

Pune – पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीची आज कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होत आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.दरम्यान, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतांमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे.  तर दुसऱ्या बाजूला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीत रविंद्र धंगेकर 2,200 मतांनी आघाडीवर आहेत.

या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. मी पोस्टल मतांमध्ये कायम आघाडीवर राहतो. आता शेवटच्या फेरीपर्यंत माझी अशीच आघाडी राहणार. माझं लीड २ हजार मतांच्या पुढे जाईल. मतांची कोणतीही विभागणी होणार नाही. मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपला असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.