विजय सेतुपतीच्या फिल्म सेटवर मोठा अपघात, २० फुटांवरून खाली कोसळून स्टंटमनचा मृत्यू

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दु:खद बातमी पुढे येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक विजय सेतुपती याच्या सिनेमाच्या सेटवर मोठा अपघात झाला आहे. स्टंटमन एस सुरेश विजय सेतुपतीसाठी स्टंट परफॉर्म करत असताना मोठी दुर्घटना घडली. ज्यामुळे स्टंटमन एस सुरेशचे निधन झाले आहे. एस सुरेश ५४ वर्षांचा होता. या वृत्तानुसार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

कशी घडली दुर्घटना?
वेत्रीमारन यांच्या दिग्दर्शनाखाली चेन्नईतील वांदालूर येथे ‘विदूथलई’ सिनेमाचे शूटींग चालू होते. यादरम्यान स्टंटमन सुरेश मुख्य स्टंट दिग्दर्शकांसोबत सहाय्यक म्हणून काम करत होता. सुरेश स्टंट करत असताना त्याचे सहकारीही तिथे उपस्थित होते. सिनेमातील एका सीननुसार, सुरेशला उंचावरून खाली उडी मारण्याचा स्टंट करायचा होता.

हा स्टंट करण्यासाठी सुरेशला दोरीच्या मदतीने क्रेनला बांधले गेले होते. परंतु सीन सुरू होताच दोरी तुटली आणि स्टंटमन सुरेश जवळपास २० फुटांवरून खाली कोसळला. या अपघातानंतर त्वरित सुरेशला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

२५ वर्षांपासून करत होता काम
माध्यमांतील वृत्तानुसार, सुरेश २५ वर्षांचा असल्यापासून फिल्म इंडस्ट्रीत स्टंटमन म्हणून काम करत होता. या दुर्घटनेनंतर सिनेमाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.