यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल – अजित पवार

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल; महाविकासआघाडी सरकारच्या वतीनं सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

तर, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे. काल (बुधवारी) दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.