उत्पल पर्रीकरांना पक्षानी तिकीट नाकारलं नव्हतं पण… , देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

म्हापसा : भारतीय जनता पक्षाचे म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारल्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारलेलं नाही, पक्षानी त्यांना दोन मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती त्यातील एक तर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ होता. परंतु त्यांना पणजी मतदारसंघातूनच उमेदवारी हवी होती. त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी नाकारली. तर, उत्पल पर्रीकर आमच्या सोबत नाहीत याचं आम्हाला दुःख आहे पण भाजप ही देशव्यापी पार्टी आहे, त्यामुळे ती पुढे मार्गक्रमण करतच राहणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, आमच्यापासून जे विभक्त झालेत त्यांनी परत यावेत ही आमची इच्छा आहे. तसे प्रयत्न नेहमीच सुरु असतात. परंतु कोणी जर ठरवलंच असेल परत यायचं नाही तर आमच्याही प्रयत्न करण्याच्या सीमा आहेत. मात्र, अशाप्रकारे जर कोणी परत आला तर आम्ही त्याच निश्चित स्वागत करू असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना म्हापशाच्या काँग्रेस उमेदवाराचा रिमोट कंट्रोल कळंगुटच्या हातात असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी मायकल लोबो यांचं नाव न घेता केला आहे. यावर ज्यांच्या हातात रिमोट कंट्रोल आहे त्यांचा कंट्रोल ते परत आले तर तुमच्याकडे घेणार का ? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला असतात त्यावर ते म्हणाले अशा लोकांचा रिमोट कंट्रोल आम्ही हाती घेणार नाही आणि त्याची आम्हाला गरज देखील नाही असं ठणकावून त्यांनी सांगितलं