संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, म्हणून विश्व हिंदू परिषद राबवणार ‘निमंत्रण संपर्क अभियान’

Ayodhya Shri Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने येत्या १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘निमंत्रण संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे.

पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने विश्व हिंदू परिषदेने अभियान आयोजित केले आहे. याअंतर्गत देशभरातील कोट्यवधी हिंदूंशी संपर्क साधला जाईल. कोट्यवधींना प्रत्यक्ष अयोध्यत जाऊन सोहळ्यात सहभागी होणे शक्य होणार नाही, त्यामुळे आपल्याच भागात हा मंगलमय सोहळा साजरा व्हावा, या दृष्टीने हे अभियान आहे.

अभियानाचा प्रारंभ ५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत झाला. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य वास्तूच्या गर्भगृहात अक्षतांचे पूजन व अभिमंत्रण करण्यात आले. या कार्यक्रमास भारताच्या सर्व प्रांतांतून विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व प्रतिनिधींकडे पूजित व अभिमंत्रित अक्षतांचे कलश सुपूर्द करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन सर्व प्रतिनिधी आपापल्या प्रांतांत परतले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने सहमंत्री ॲड. सतीश गोरडे व प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी यांनी कलश स्वीकारला.

उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात अयोध्येतून आणलेल्या अक्षतांमध्ये भर घालून अक्षतापूजनाचा कार्यक्रम प्रत्येक प्रांतात केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात हा कार्यक्रम येत्या रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थानात आयोजिलेला आहे. महंत योगेशबुवा रामदासी, कार्यवाह, श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या शुभहस्ते पूजन होऊन श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा प्रारंभ होईल.
सकाळी १०.०० वाजता ही कलश यात्रा लाल महाल चौक, फरासखाना चौक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, समाधान चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, शाहू चौक, राष्ट्रभूषण चौक, स्वारगेट अशी जाईल. समारोप श्वेतांबर जैन मंदिर, दादावाडी येथे होईल. श्रीराम प्रतिमा विराजमान असलेल्या रथावर मोठा चार फूट कलश, पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक यात सहभागी असतील. प्रत्येक शंभर मीटर अंतरावर सार्वजनिक मंडळे, संस्था यांच्यामार्फत यात्रेचे स्वागत केले जाईल.

समारोप कार्यकम आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. यशोधनजी साखरे महाराज यांच्या उपस्थितीत होईल. या पूजित/अभिमंत्रित अक्षतांचे कलश पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सर्व चोवीस भाग/जिल्हा प्रमुखांना सुपूर्द करण्यात येतील.
सर्व भागप्रमुख पुढे आपपल्या भागात या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांशी संपर्क साधून, त्यांच्याबरोबर बैठका घेऊन, अशाच कलशपूजन कार्यक्रमाच्या आयोजनाची व्यवस्था नगर व वस्ती पातळीवर करतील.

हजारो कार्यकर्ते या अक्षता व प्रभू श्रीरामचंद्रांची एक प्रतिमा घेऊन घरोघरी संपर्क साधतील. नगर व वस्तीपातळीवरील अक्षता कलशपूजन २२ डिसेंबर रोजी ‘गीता जयंती’चे औचित्य साधून होईल व त्यानंतर घरोघरी संपर्क अभियान सुरू होईल. या अभियानात कार्यकर्ते हिंदू कुटुंबांना २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करतील. या आवाहनातून विश्व हिंदू परिषद हिंदू समाजास त्या दिवशी एकत्र येण्याची साद देणार आहे. लोकांनी प्राणप्रतिष्ठासमयी, म्हणजेच सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत एकत्र येऊन आपले गाव, गल्ली, कॉलनीमधील कोठल्याही मंदिरात भजन-कीर्तनाचे आयोजन करावे, असे आवाहन केले जाईल. याबरोबरच शक्य असेल तेथे अयोध्येतील कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर (एलईडी स्क्रीनवर) या सोहळ्याचे प्रक्षेपण करावे. हिंदू भक्तीपद्धतीला अनुसरून शंखध्वनी, घंटानाद, रामनाम जप, सुंदरकांड पाठ, हनुमान चालिसा व रामरक्षास्तोत्र पठणदेखील सामूहिक पद्धतीने करावे. २२ जानेवारीला प्रत्येकाने संध्याकाळी घराबाहेर दिवा, दीपमाळा व पणत्या लावून पुनश्च दीपावली साजरी करावी, असेही आवाहन या संपर्क अभियानात करण्यात येईल.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिनांक १ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान गावोगावी रामकथा सप्ताह, भजन सप्ताह, कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिरांचे सुशोभीकरण केले जाईल व गल्लोगल्ली भगव्या पताकांच्या माळा व घराघरांवर भगवे ध्वज लावले जातील. या निमित्ताने सर्व हिंदू एकत्र येऊन राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेतील.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी