‘एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

Ekda Yeun Tar Bagha: हास्याची जबरदस्त आतषबाजी करण्यासाठी लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर सज्ज झाले आहेत. एक नाही दोन नाही तर तब्ब्ल १४ विनोदी ‘हुकमी एक्के’ त्यासाठी त्यांनी एकत्र आणले आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’ असं म्हणत, लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन ८ डिसेंबरला खास चित्रपटरुपी भेट प्रेक्षकांना देणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

वेगळे काहीतरी करण्याच्या नादात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अनेकदा गुंतागुंती उद्भवतात व यातून बाहेर पडताना त्याची होणारी त्रेधातिरपीट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट. शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटात फुलंब्रीकर कुटुंबाची आणि त्यांनी सुरु केलेल्या हॉटेलची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे. नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक आपल्या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना ट्रीटमेंट देताना काय गमतीजमती घडतात? हे दाखवतानाच या कुटुंबाच्या प्रेमाची त्यांच्या नात्यातल्या बंधाची कथा यात पहायला मिळणार आहे.

गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, आदि चित्रपटसृष्टीतील विनोदाचे एक्के आपल्या अचूक विनोदी टायमिंगने काय आणि कशी धमाल उडवतात हे पाहणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची फूल ऑन ट्रीट असणार आहे. आयुष्यामध्ये चित्रविचित्र घटना घडायला लागल्या की, नकळत त्याचं आपल्यालाच हसू वाटायला लागतं असं काहीसं ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शक प्रसाद खांडेकर सांगतात.

‘आली आली गं भागाबाई’, अय्यो, मस्तीची सफर, अशी साजेशी तीन गाणी चित्रपटात असून त्यातील ‘आली आली गं भागाबाई’ हे गीत सध्या चांगलंच गाजतंय. यातील गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. रोहन प्रधान, राहुल वैद्य, वैशाली सामंत, सोनू निगम यांनी यातील गाणी गायली आहेत.

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनोज अवना आणि कृपाल सिंग कार्यकारी निर्माते आहेत. लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.

८ डिसेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ सर्वत्र प्रदर्शित होतोय.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी