‘छगन बरळला… 3 % ब्राह्मणांवर बोलताना तर ही पांढरी दाढी अधिकच जोमात येते’

पुणे– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘शाळेत शारदा, सरस्वती मातेचा फोटो का? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी जातीयवादी फुत्कार सोडले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा समोर आला असून या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे.

यातच आता परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी छगन बरळला… या शीर्षकाखाली एक पोस्ट लिहिली असून यातून त्यांनी भुजबळ आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. ते म्हणतात, काल पुण्यात समता परिषदेचा मेळावा होता, त्यातला मुख्य वक्ता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 2.5 वर्षे जेलमध्ये राहून आता जामिनावर बाहेर असलेला छगन भुजबळ होता. या छगनचे म्हणणे असे आहे की सरस्वती देवीचे फोटो शाळांमध्ये लावले नाही पाहिजे; कारण देवी सरस्वतीने फक्त 3% लोकांना म्हणजे ब्राह्मणांना विद्या दिली.

छगनराव देवी देवतांचा अपमान बिनधास्त करू शकतात. कारण त्यांना तसे अभय त्यांच्या आकाकडून प्राप्त झालेले आहे. त्यासोबतच 3 % ब्राह्मणांवर बोलताना तर ही पांढरी दाढी अधिकच जोमात येते. कारण छगन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो आवडता छंद आहे. छगन हे बोलला याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. तो या आधीही असे अनेकदा बरळला आहे पुढेही बरळत राहील मला ब्राह्मणांना काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा.

1) महाराष्ट्रातील ब्राह्मणांची लोकसंख्या ही 7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राजकारणी खोट बोलतात 3% सांगून दिशाभूल करतात.
2) आम्ही संघटित झालो तर विधानसभेचे 43 आमदार निवडून आणू शकतो आणि 20+ आमदार पाडू शकतो. कारण ग्रामीण भागातून ब्राह्मण समाज शहरात एकवटला आहे. त्यामुळे शहरी मतदारसंघात आमची ताकत अधिक आहे. 10 ते 12 % सर्व मोठ्या शहरात.
3) सर्वच राजकीय पक्षांना अस वाटत की, ब्राह्मण म्हणजे फक्त भाजपचा मतदार. पण हे 100% खरे नाही. स्थानिक संबंधाच्या आधारावर अनेक इतर पक्षाचे उमेदवार आपली मत मिळवतात. उदा : अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप किंवा शिवसेनेचे (ठाकरे गट), परभणीचे आमदार राहुल पाटील यांना विचारा ते खुलेपणाने मान्य करतील. असे अजूनही अनेक मतदारसंघ आहेत.

आता वेळ आली आहे ती आपल्या दारात मत मागायला येणाऱ्या सर्वच पक्षाच्या लोकांना हे विचारायची की, बाबांनो तुम्ही आमची मत घेता; परंतु जेव्हा आमची जाहीर निंदा नालस्ती केली जाते तेव्हा का शांत बसता? कोणत्याच पक्षाला याविषयी सोयर सुतक नसेल, तर आम्ही तरी का मतदान करायचे तुम्हाला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.