विधान परिषदेसाठी आज मतदान; पाचही मतदारसंघांत चुरस

Nasik – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षकमतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातही विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षकमतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या दोन फेब्रुवारीला होणार आहे.(Voting today for Legislative Council)

काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी यासह विविध नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुनी निवृत्तिवेतन योजना पुन्हा लागू करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला. एरवी शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांमधील निवडणूक फारशी चर्चेत नसते. मात्र यंदा काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे ती अधिक चर्चेत आली.