शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला, रिझवी आता ‘या’ नावाने ओळखले जाणार 

लखनौ – उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज इस्लाम धर्म सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला. सोमवारी सकाळी त्यांनी दसना देवी मंदिरातील शिवलिंगाला दूध अर्पण करून हिंदू सनातन धर्मावरील श्रद्धा व्यक्त केली. रिझवी रविवारी रात्रीच आग्रा येथून दसना देवी मंदिरात आले होते.

सकाळी 10.30 वाजता मंदिरात महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत मंदिराच्या पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चार व विधीद्वारे सनातन धर्माचा विधिवत स्वीकार केला. सय्यद वसीम रिझवी यांचे नवे नाव आता जितेंद्र नारायण सिंह त्यागी असेल. आता त्याचे गोत्र वत्स आहे. धर्मांतरापूर्वी नरसिंहानंद गिरी महाराज आपले नवीन नाव ठरवतील, असे रिझवी म्हणाले होते.

धर्मांतरानंतर वसीम रिझवी म्हणाले की, सनातन धर्म हा जगातील सर्वात पवित्र धर्म आहे. यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी धर्मांतरासाठी ६ डिसेंबरचा पवित्र दिवस निवडल्याचे सांगितले. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशिदीची इमारत उद्ध्वस्त केली होती.

वसीम रिझवी म्हणाले की, आजपासून ते हिंदुत्वासाठीच काम करणार आहेत. ते म्हणाले की, मुस्लिमांचे मत कोणत्याही राजकीय पक्षाला जात नाही. मुस्लिम फक्त हिंदुत्वाच्या विरोधात आणि हिंदूंचा पराभव करण्यासाठी मतदान करतात.काही दिवसांपूर्वी वसीम रिझवी यांनी मृत्यूपत्र जारी केले होते. या मृत्युपत्रात त्यांनी मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली होती. यती नरसिंहानंद यांनी चिता पेटवली पाहिजे, असेही ते म्हणाले होते.