आमच्या उमेदवाराला दोन अतिरिक्त मते कशी पडली त्याची चौकशी आम्ही करत आहोत – चव्हाण 

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत भाजपाने धूळ चारली आणि शिवसेनेची पुरती नाचक्की झाली.

दरम्यान, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेनेने (Shivsena) आपल्या उमेदवारांसाठी ४२ मतांचा कोठा ठेवला होता. मात्र, काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रताप गढी यांना ४४ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या (NCP) प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली. शिवसेनेचे एक मत बाद झाल्यामुळे संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. या विषयी बोलताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, निकालाचे विश्‍लेषण आम्ही केलेले नाही. काँग्रेस पक्षाने ठरल्याप्रमाणे सर्व मतदान केले आहे. 42 मतांचा कोटा होता त्याप्रमाणे आम्ही काँग्रेसच्या उमेदवारांला मते दिली आहेत. दोन अतिरिक्त मते कशी पडली त्याची चौकशी आम्ही करत आहोत. चूक झाली किंवा रणनीतीत कसे कमी पडलो याचा शोध घेणार आहोत. एक दोन दिवसात आणखीन स्पष्ट होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.