तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी एक्स बॉयफ्रेंड शीजान खानला अटक, आईने केले गंभीर आरोप

मुंबई- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma Suicide) हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने मनोरंजन सृष्टी हादरली आहे. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी तुनिषाने ‘अलीबाबा दास्तान-ए-काबूल’ या सीरियलच्या सेटवर गळफास लावला आहे. नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तुनिषाचा एक्स प्रियकर आणि अलीबाबा दास्तान-एक-काबुल सीरियलचा स्टार शीजान मोहम्मद खान (Sheezan Mohammad Khan) याला अटक केली आहे. इतकेच नव्हे तर तुनिषाच्या आईकडून शीजानविरोधात तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी प्रभावित केल्याचा गंभीर आरोप केलेली एफआयआरही दाखल झाली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा तिचा को-स्टार शीजानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. शीजानचे नुकतेच तुनिषासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तुनिषा खूप अस्वस्थ झाली आणि त्यानंतर २४ डिसेंबर रोजी तिने सेटवरच मृत्यूला कवटाळले.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तुनिषाचा को-स्टार शीजानविरुद्ध वालीव पोलिसात एफआयआर नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आयपीसी कलम ३०६, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याला वसई न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यानंतर मुंबई पोलिसांकडून शीजानविरुद्ध रिमांडही मागितला जाणार आहे.

शीजानची चौकशी सुरू आहे
शीजान खानचे काही मित्र मुंबईतील वालीव पोलीस ठाण्याच्या बाहेर पोहोचले आहेत. शीजानची चौकशी सुरू आहे. शीजानचे काही मित्र आणि प्रॉडक्शनमधील काही लोक वालीव पोलीस ठाण्यात हजर आहेत. त्याचवेळी नायगाव येथील स्टुडिओमध्ये पोलिसांकडून चौकशी आणि तपास सुरू असून, सध्या तुनिषाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.