रोहित विरुद्ध धोनी, वानखेडेवर रंगणार आयपीएल २०२३मधील सर्वात मोठा सामना; पाहा कोणाचं पारडं आहे जड

CSK vs MI : या IPL हंगामातील सर्वात मोठा सामना आज (8 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. येथे पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चार वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात सामना होणार आहे. या दोन संघांमधील सामने नेहमीच रोमांचक राहिले आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलच्या या दोन सर्वात यशस्वी संघांमधील आजचा सामनाही खूप रंजक ठरू शकतो.

तसे, आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा वरचष्मा असेल अशी अपेक्षा आहे. कारण चेन्नईचा संघ मुंबईच्या तुलनेत अधिक संतुलित दिसत आहे. फलंदाजीत दोन्ही संघांची तुल्यबळ स्पर्धा असली तरी गोलंदाजीत चेन्नईचा संघ मुंबईच्या पुढे गेला आहे. मुंबईचा फिरकी विभाग खूपच कमकुवत आहे, तर चेन्नईकडे जडेजा आणि मोईन अलीच्या रूपाने दोन अनुभवी फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत. मुंबईच्या तुलनेत चेन्नईमध्ये अष्टपैलू खेळाडूंची संख्याही चांगली आहे, ज्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगला समतोल साधला जातो.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. या संघाला पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात आरसीबीने 22 चेंडू बाकी असताना केवळ दोन गडी गमावून सामना जिंकला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघातील लढाऊ कौशल्य अजिबात दिसून आले नाही.

चेन्नईने या मोसमात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून सामना करावा लागला होता, परंतु दुसऱ्या सामन्यात या संघाने लखनौचा 12 धावांनी पराभव केला आणि विजयी मार्गावर परतले. या सामन्यात चेन्नईचे फलंदाज जबरदस्त रंगात दिसले.अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्ज आजच्या सामन्यात विजय मिळवू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे.