भाजपपेक्षा आमच्याकडे नोटा कमी होत्या त्यामुळे आम्हाला कमी मतं मिळाली – राऊत

मुंबई – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मंत्री आणि गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या शिवसेनेचा दावा आता किती हास्यास्पद होता हे देखील समोर आले आहे. सोशल मिडीयावर आता सेनेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. सेनेप्रमानेच राष्ट्रवादीची देखील अवस्था असून खासदार शरद पवार यांना देखील ट्रोल केले जाऊ लागले आहे. दुसऱ्या बाजूला पंजाबमध्ये भाजप,कॉंग्रेस, अकाली दल आदी पक्षांना धूळ चारणाऱ्या आपवर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकारणात, लोकशाहीत जो जिंकतो त्याचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे.पंजाबमध्ये आपचा ऐतिहासिक आणि क्रांतीकारी विजय झाला. त्यामुळे ज्या ज्या पक्षाचा विजय झाला त्यांचं मी शिवसेनेकडून अभिनंदन करतो. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत होती तिथे त्यांचा मोठा पराभव झालाय. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा होती पण ते कमी पडले.

पंजाबमध्ये लोकांना पर्याय मिळाला. दिल्लीत केजरीवालांनी जे काम केलं त्याचं त्यांना फळ मिळालं. भाजपचा जो विजय आहे तो त्यांच्या निवडणूक मॅनेजमेंटचा विजय आहे. पंजाबमध्ये भाजप हा राष्ट्रीय पक्ष, मोदी आणि शाहांचाच चेहरा, तरीही पंजाबमध्ये भाजपला कोणत्या प्रकारचं यश मिळालं याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात आमच्या पद्धतीने लढलो. त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापेक्षा आम्ही कमी पडलो.कारण, आमच्याकडे नोटा कमी होत्या. आम्ही लढलो, ही लढाई चालू राहील. विजय पराजय अंतिम नसतो. शिवसेनेच्या बाबतीत ही सुरुवात आहे. भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू.

या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय मिळाला असला तरी त्यांनी विजय पचवायला शिकलं पाहिजे. काहींना विजय पचवता येत नाही. त्यांना अजीर्ण होतं. त्यामुळे त्यांना सांगायचं आहे की विजय पचवा. त्या त्या राज्याच सुडाचं राजकारण न करता, राज्याचं, तिथल्या लोकांचं हित पाहा. असा सल्ला देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे.