आम्हाला पवार साहेबांनी शिकवले आहे की अन्यायाविरुद्ध उभे रहा – Jayant patil

Jayant patil – शरद पवार यांची (Sharad Pawar) खरी राष्ट्रवादी ही शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर आहे. जर तुम्ही विकासासाठी तिकडे गेले असाल तर या शेतकर्‍यांच्या मागे उभे रहा! राज्याची तिजोरी तुमच्या हातात आहे. पिकविमा तुमच्या हातात आहे, शेती खाते तुमच्या हातात आहे. मग मुख्यमंत्र्यांना आणि दुसर्‍या उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची काय गरज? असा परखड सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा शेतकरी आक्रोश मोर्चा आज दिंडोरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना जयंत पाटील यांनी संबोधित केले. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आज आपला शेतकरी उघड्यावर पडला आहे. कधी नव्हे ते इतके मोठे दुष्काळाचे संकट शेतकर्‍यांवर आले आहे. आठ महिने दुष्काळाला तोंड देत होतो, आता अवकाळी पावसाने सगळे नष्ट केले आहे. शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आज सकाळी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्यावेळी एक शेतकरी कुर्‍हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन-साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर नको हे, असे त्या शेतकर्‍याचे म्हणणे होते. ही या राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. शेतकर्‍यांच्या कर्जाचे पूनर्गठन केले पाहिजे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे धोरण आखले पाहिजे. या सरकारने अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे, असे सरकार म्हणत आहे. जिथे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे, तिथे शेतकर्‍यांना वीजबिल माफ केले जाणार का? विद्यार्थ्यांना फी माफ केली जाणार का? सरकारने कोणत्याही नियम व अटी न ठेवता सरसकट दुष्काळ जाहीर करावा व सर्वांना सर्व सवलती द्याव्यात, ही आमची मागणी आहे. नाशिक जिल्ह्यात दुधाला २७ रुपये भाव दिला जातो. या भावामध्ये शेतकर्‍यांनी जगायचे कसे? कर्नाटक सरकार दुध उत्पादक शेतकर्‍यांना ५ रु प्रती लिटर अनुदान देते. पण आपल्या शेतकर्‍यांना कोणतेही अनुदान दिले जात नाही. अमूलचे दुध विकण्यासाठी व्यवस्था आहे, कर्नाटकचे नंदिनी दूध विकण्याची व्यवस्था आहे, पण आपल्या महाराष्ट्रात आपल्याच राज्यातील शेतकर्‍यांना भाव दिला जात नाही, असेही उद्वेगाने ते म्हणाले.

विकासकामांसंदर्भात ते म्हणाले, सुरगाणा तालुक्यातील छोटी धरणे, वळण बंधारे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे येथील आदिवासी शेतकर्‍यांना मदत होईल. यासंदर्भात मी शब्द ही दिला होता. पण आमचे सरकार गेले. पण आताचे सरकार त्यावर काम करताना दिसत नाही. सर्व कामे ठप्प पडली आहेत.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर या सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि परिणामी कांदा इथेच सडतो. पिकविमा कंपन्या काही कारणे सांगून परतावा देत नाहीत. महाराष्ट्रात फसव्या पिकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पिकविम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळत नाही, ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते, दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पिकविम्याची रक्कम मिळेल. शेतकर्‍यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. त्यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या सरकारवर शेतकर्‍यांचा विश्वास राहिलेला नाही.

जयंत पाटील बोलताना म्हणाले की, आज आम्ही मोर्चा आणला; पण हा लढा इथेच थांबणार नाही. हा मुद्दा आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने येणार्‍या हिवाळी अधिवेशनातही लावून धरणार. आपल्यातून तिकडे गेलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये चिंतन करत आहेत. पण शरद पवार साहेबांची खरी राष्ट्रवादी ही शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर आहे. जर तुम्ही विकासासाठी तिकडे गेले असाल तर या शेतकर्‍यांच्या मागे उभे रहा! राज्याची तिजोरी तुमच्या हातात आहे, पिकविमा तुमच्या हातात आहे, शेती खाते तुमच्या हातात आहे. मग मुख्यमंत्र्यांना आणि दुसर्‍या उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची काय गरज?, असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले आहे की अन्यायाविरुद्ध उभे रहा. ज्याच्यावर अन्याय झाला त्या मागे जा म्हणून महाराष्ट्र आज पवार साहेबांना मानतो. या सत्ताधार्‍यांना विनंती आहे की दुप्पट उत्पन्न देतो, म्हणाला होता. आमचे आयुष्य संपलेले आहे. ते संपलेलं आयुष्य तरी सुरु करा, अशी भावनिक टिप्पणी बोलताना जयंत पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्य़ा-

मी इरफानसोबत रिलेशनमध्ये असताना गंभीर मला नियमित मिसकॉल करायचा; बॉलीवूड अभिनेत्रीचा उलगडा

‘कुणाच्या ताटाखालचे मांजर होण्याचे महाराष्ट्राच्या रक्तात नाही, मात्र आज…’, अजित पवारांचे वक्तव्य

शालेय पोषण आहारात अंडी नकोत : डॉ. कल्याण गंगवाल

Business Idea : ‘या’ फास्ट फूडचा व्यवसाय टाकून महिन्याला कमवू शकता लाखो रुपये