आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही – संजय राऊत

मुंबई : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना या घडामोडींच्या बाबत भाष्य केले. ते म्हणाले, अनेक वर्षे शिवसेना राजकारणात आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सहा जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढत आहे. त्यातील दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि निवडून आणू ही शिवसेनेची भूमिका आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. ज्या अर्थी एखादा उमेदार निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करतो तेव्हा त्यांच्याकडे निवडणून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. यासाठी ४२ मते लागतात. संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे त्याअर्थी त्यांच्याकडे ४२ मते आहेत. अशा वेळी आम्ही त्यामध्ये पडणे गरजेचे नाही. पण असं लक्षात येत आहे की त्यांच्याकडे मते नाहीत. त्यांनी आमच्याकडे मते मागितली पण आम्ही कशी मते देणार? आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे अपक्ष नाही. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो, असे संजय राऊत म्हणाले.