2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ, त्यावेळी मुख्यमंत्री पदाचे पाहू – संजय राऊत

जळगाव – विरोधीपक्षनेते अजित पवार (AJit Pawar) यांनी काल एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्याशी सुरु असलेल्या शाब्दिक चकमकीमुळेदेखील अजित पवार चर्चेत असताना आता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. एखाद्याच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील असंही राऊत म्हणाले.

सर्वांत जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी मजबूत आहे. आता सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत. सध्या मुख्यमंत्री पदाचा विषय नाही असेही राऊत म्हणाले. 2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ, त्यावेळी पाहू असेही संजय राऊत म्हणाले.