उदयपूर नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची राज्यात अंमलबजावणी करणार : नाना पटोले

मुंबई –  उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करतानाच केंद्रातील मोदी सरकारने ८ वर्षापासून सुरु केलेल्या कारभाराची पोलखोल काँग्रेस पक्ष करणार आहे. अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवन येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील, प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू  यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर भाजपा कशी अपयशी ठरली ते जनेतपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. केंद्रातील भाजपा सरकारचा दृष्टीकोन हा केवळ व्यापारी राहिलेला आहे त्यातून काँग्रेसने उभे केलेले सर्व काही विकून खाजगीकरण केले जात आहे. लोकशाही व संविधान व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आवाज उठवणार असून ब्रिटिशांविरोधात लढलो तसेच आता या भाजपाविरोधात काँग्रेस कार्यर्त्यांना लढावे लागणार आहे.

दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होत आहे, या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.