जेल मधून बाहेर पडताच सदावर्ते यांनी फडणवीस-शाह यांना केली ‘ही’ विनंती 

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (ADV. Gunaratna Sadavarte) यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांनी तुरुंगातून सुटका होताच महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) विरोधात दंड थोपटले आहेत. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर (Arthur Road Jail) आले होते.मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिलाय. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन (Bail) देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत.

कारागृहातून बाहेर पडताच सदावर्ते यांनी हम है हिंदुस्थानी अशी घोषणाबाजी केली. शिवाय आपला कैदीनंबर सांगत आपण कष्टकऱ्यांसाठी लढणारा कैदी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेरील आंदोलन भडकवल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्यांना 8 एप्रिलला रात्री १० वाजता अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली, तर एकदा न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली. अखेर आज जामिन मिळताच सदावर्तेंचा कारागृहाबाहेर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

सदावर्ते म्हणाले,  कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात राहू द्या, असं मी महाराष्ट्राच्या सरकारला आदरपूर्वक सांगतो. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना मी विनंती करतो की माझी हत्या झाली, तर आपण योग्य ती पावलं उचलावी. तसे काही घडण्याआधीही योग्य ती पावलं उचलावी.