पंतप्रधान मोदींनंतर कोण? सर्वेक्षणात लोकांनी या नेत्यावर दर्शविला विश्वास  

PM Modi Successor :  लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) आता अगदी जवळ आली आहे. दरम्यान, निवडणुकीशी संबंधित अनेक सर्वेक्षण केले जात आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उत्तराधिकारी संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात पीएम मोदींच्या उत्तराधिकार्‍यासाठी भाजपचा सर्वात योग्य नेता कोण असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इंडिया टुडे-सी व्होटरच्या सर्वेक्षण ‘मूड ऑफ द नेशन पोल’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोणाला बनवायचे याबाबत हजारो लोकांनी मत मांडले. पीएम मोदींचा अद्याप निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसला तरी, या सर्वेक्षणात पीएम मोदींचा उत्तराधिकारी बनल्यास सर्वात योग्य कोण असेल हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात लोकांनी अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांना मतदान केले. सर्वेक्षणानुसार, 29 टक्के लोकांनी अमित शाह यांना पीएम मोदींचा उत्तराधिकारी म्हणून नाव दिले आहे. 26 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची निवड केली, तर 15 टक्के लोकांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव पुढे केले. अमित शहा सध्या केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि गुजरातमध्ये भाजपचे (BJP) सरकार स्थापन झाल्यापासून ते मोदींच्या जवळचे आहेत. केंद्रात मोदींची सत्ता आल्यावर अमित शहा (Amit Shah) यांना भाजपचे प्रमुख करण्यात आले. अमित शहा यांच्यानंतर ज्या भाजप नेत्यावर लोकांनी सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. मोदींचे उत्तराधिकारी म्हणून 26 टक्के लोक योगी आदित्यनाथ यांना पसंत करत आहेत.

त्याच वेळी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून  सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेले नितीन गडकरी योग्य असतील, असा विश्वास सुमारे 15 टक्के लोकांनी व्यक्त केला.