कर्नाटकातील निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्री चेहरा कोण असू शकतो?

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या  ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे असून भाजप खूपच मागे आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाचा झेंडा फडकावला. त्याचवेळी बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये काँग्रेस समर्थक आनंदोत्सव साजरा करत आहेत. काँग्रेस समर्थकही एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.

दरम्यान, त्यानंतरही पक्षाला मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचे हा प्रश्न आहे. कॉंग्रेसला सिद्धारामय्या की डीके शिवकुमार हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. दोघांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. कर्नाटकमधून अशीही माहिती येत आहे की, दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थक आमदारांसह गट बनविण्यास सुरुवात केली आहे. ट्रेंडनुसार राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे, मात्र काँग्रेसचा विजय झाला तर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.  दोन्ही नेत्यांचे समर्थक उघडपणे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये अजूनही चुरस आहे.