कर्नाटकात विजय मिळाला तरीही कॉंग्रेसची डोकेदुखी कायम; जाणून घ्या नेमके काय आहे कारण 

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या  ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे असून भाजप खूपच मागे आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाचा झेंडा फडकावला. त्याचवेळी बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये काँग्रेस समर्थक आनंदोत्सव साजरा करत आहेत. काँग्रेस समर्थकही एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.

दरम्यान, त्यानंतरही पक्षाला मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचे हा प्रश्न आहे. कॉंग्रेसला (Congress Karnataka) सिद्धारामय्या की डीके शिवकुमार हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. दोघांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. कर्नाटकमधून अशीही माहिती येत आहे की, दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थक आमदारांसह गट बनविण्यास सुरुवात केली आहे.

सुरुवातीचे कल हाती येताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या मुलानं मोठा दावा केला आहे. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी त्यांचे वडील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असायला हवेत, असा दावा केला आहे. भाजपाला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत. काँग्रेसला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार आहे. शिवाय वरुणा मतदारसंघातून माझे वडीलही निवडून येतील, असं यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले आहेत.