भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, ‘माफी मागा’ म्हणत विरोधक विधानसभेत आक्रमक

मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी होताना दिसून येत आहे. परीक्षा घोटाळा,विमा,कायदा सुव्यवस्था आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला अडचणीत आणत असल्याचे दिसत आहे. यातच आ. भास्कर जाधव यांनी केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कल सत्तधारी नेत्यांसाठी डोकेदुखीचा मुद्दा बनला आहे.

विधीमंडळात एका विषयावर चर्चा सुरु असताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांना निलंबित करा. पंतप्रधानांचं अंगविक्षेप करत जाधव यांनी सभागृहात जे वर्तन केलंय ते चुकीचं आहे.  ते पंतप्रधान यांची नक्कल करत आहेत.  या ठिकाणी अशा प्रकारची नक्कल करणं योग्य आहे का? असं फडणवीस म्हणाले.

यावर भास्कर जाधव म्हणाले की, मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो.  यावर फडणवीस म्हणाले की, अंगविक्षेप मागे घेता येतो का? हे आम्ही सहन नाही करणार.  माफी मागीतली पाहिजे. पंतप्रधान यांचा असा अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल, त्यांनी माफी मागावी असं ते म्हणाले. यावर मी माफी मागू शकत नाही, मी शब्द मागे घेतले आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं.