‘या’ व्यक्तीने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार, अदानी-अंबानींनाही सोडले मागे

हैदराबादचा उद्योगपती नासिर खान सतत चर्चेत आहे. नासिर खान (Naseer Khan) देशातील सर्वात महागड्या कारचा मालक बनला आहे. लक्झरी कार कलेक्शनच्या बाबतीत नासिरने देशातील बड्या अब्जाधीशांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांना पछाडत हैदराबादचा उद्योगपती नासिर खान याने आतापर्यंतची सर्वात महागडी कार खरेदी केली आहे.

नासिरने मॅक्लारेन लाल रंगाची ७६५ एलटी स्पायडर सुपर कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. होय, नासिरने १२ कोटी रुपये देऊन ही कार खरेदी केली आहे. अलीकडेच कंपनीकडून ही कार ताज फलकनुमा पॅलेसमध्ये पाठवण्यात आली आहे. नासिरने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर या आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे, नासिर हा ७६५ एलटी स्पायडर कारचा भारतातील पहिला ग्राहक आहे.

दुसरीकडे अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्याकडे रोल्स रॉइस घोस्ट कार आहे, ज्याची किंमत ६.२१ कोटी रुपये आहे. त्याच वेळी, मुकेश अंबानींकडे लक्झरी कारचा संपूर्ण स्टॉक आहे, ज्यामध्ये रोल्स रॉयस कलिनन सारख्या कारचा समावेश आहे.

महागड्या गाड्या खरेदीची आहे आवड
नासिरला आलिशान गाड्यांचा मोठी आवड आहे. त्याच्याकडे अशा महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. नासिर स्वत:ला कार कलेक्टर आणि उद्योजक म्हणून सांगतो. कार कलेक्शनचे अनेक फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये Rolls Royce Cullinan Black Badge, Ferrari 812 Superfast, Mercedes-Benz G350d, Ford Mustang, Lamborghini, Lamborghini Urus यांसारख्या अनेक महागड्या वाहनांचा समावेश आहे.