पंजाबचा ‘किंग’ कोण, चन्नी की भगवंत मान ?

लुधियाना : – उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

उत्तरप्रदेशसह सर्व देशाचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे पंजाबची. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे बोलले जात असताना आजच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी फेरबदल करत चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. काँग्रेसमधील अंतर्गत कलह त्यातही कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हा उपाय केला होता. पण त्यानंतरही कलह काही थांबला नाही. नंतर सिद्धू आणि चन्नी असा वाद सुरू झाला. त्यातच अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली.

काँग्रेसनेही वाद काखोटीला बांधून चन्नी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. तर, दुसरीकडे आम आदमी पार्टीने भगवंत मान यांच्या नेतृत्वात मैदानात रणशिंग फुंकले होते. भाजपला तर पंजाबात चेहराच नव्हता. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली. 117 जागांसाठी झालेल्या या मतदानात एक्झिट पोलनुसार सध्या आप आघाडीवर दिसतंय. आपची सत्ता येईल असं चित्रं आहे. त्यामुळे भगवंत मान पंजाबचे सरदार ठरतात की चन्नी दलित मतांना आपल्याकडे खेचून पंजाबची सरदारकी गाजवतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.