ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत – आदित्य ठाकरे 

मुंबई – राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडाचे धक्के अजूनही पक्षाला बसत असताना विरोधक देखील शिवेनेवर (Shivsena) रोज निशाणा साधताना दिसत आहेत. तर बंडखोर आमदार आणखी काही आमदार आणि खासदार सोबत येतील असा दावा करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. आम्ही सगळीकडे फिरत आहोत. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, ते जातील. पण मूळ नागरिक आहे, जो शिवसैनिक (Shivsainik) आहे. ज्यांचे रक्त भगवे आहे; ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला. कदाचित आमच्याकडून राजकारण कमी झाले असेल. समाजकारणात मात्र आम्ही कोठेही कमी पडलो नाही. ज्यांना परत शिवसेनेत यायचं असेल, त्यांना दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना वाटतंय की तिकडे त्यांचं भलं होईल तर तिथेच थांबावं. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी लोकांसमोर यावं. जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.