Jitendra Awhad : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय- जितेंद्र आव्हाड

ठाणे – राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेनेआव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करून त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. या घडामोडीनंतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की,  पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

नेमकं काय घडलं ?

मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला.