राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

मुंबई – सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी चांगलेच अडचणीत आले असताना ओबीसी आरक्षण मिळत नसेल तर राजकारणात कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

ओबीसी आरक्षण संदर्भात मध्य प्रदेशने दोन दिवसांत असं काय केलं माहीत नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितलं नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं. तुम्ही खासदार आहात, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची ते कळत नाही? आता तुमची घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या,असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. कारण चंद्रकांत दादांचे वक्तव्य म्हणजे गृहिणींचा अपमान असल्याचा दावा आता विरोधक करू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिव्हारी लागणारी ही टीका चंद्रकांत पाटील यांनी केल्याने राष्ट्रवादीकडून देखील आक्रमक भूमिका घेतली जात आहे.