चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या – विद्या चव्हाण 

मुंबई – सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी चांगलेच अडचणीत आले असताना ओबीसी आरक्षण मिळत नसेल तर राजकारणात कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

ओबीसी आरक्षण संदर्भात मध्य प्रदेशने दोन दिवसांत असं काय केलं माहीत नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितलं नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं. तुम्ही खासदार आहात, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची ते कळत नाही? आता तुमची घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या,असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावर आता राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगतेमाय होऊनी जगाची नाळे वाट जगविते. चंद्रकांत पाटील तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देते. सहकुटुंब अवश्य या.असं चव्हाण यांनी म्हटले आहे.