कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? – नवाब मलिक

मुंबई  – शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद कर्नाटकात आता सर्वदूर पसरला आहे आणि चांगलाच चिघळला आहे. याबाबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता कर्नाटकातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने पुढचे 3 दिवस माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, देशामध्ये कुणी काय खायचं… कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधानांना ट्वीट करुन केला आहे.

मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुली शिकवा या घोषणेचं काय झालं? असाही सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांना विचारला आहे. भाजप आणि संघपरिवाराकडून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची ही सरळसरळ पायमल्ली आहे असेही नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.