सगळा कारभार प्रशासनाच्या भरवशावर किती दिवस चालणार ? मनसेचे शिंदे सरकारवर शरसंधान

Pune – महाराष्ट्रात ठाकरे सरकार जाऊन अनेक दिवस झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी सुरु आहे. इतके दिवस झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही.

अनेक समस्यांचा सामना जनतेला,राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने करावा लागत आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देखील अनेक अडचणी येत आहेत. यावरूनच विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, आता मनसेचे नेते योगेश खैरे यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. मंत्रालयात मंत्री नाहीत…. महानगरपालिकेत नगरसेवक नाहीत ! सगळा कारभार प्रशासनाच्या भरवशावर किती दिवस चालणार ?? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बलात्काराच्या घटना, खड्यांचं साम्राज्य, सणासुदीचे दिवस ! लोकांनी प्रश्न आणि जाब कुणाला विचारायचा ? लोकांचा कनेक्ट लोकप्रतिनिधिंशी असतो…. अधिकारी किती दाद देतात याचा अनुभव सगळयांना आहे !! असं त्यांनी म्हटले आहे.