उद्धवजी …आमच्या देवेंद्रजींच्या नादी लागू नका; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना निर्वाणीचा इशारा 

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray)  हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, उद्धवजी, कमरेखालचे वार करून तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. जे बोललाय ते ही आरोपपत्राचा भाग आहे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे तरी ही तुम्ही शितोंडे उडवण्याचा प्रयत्न केलात. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणा-या तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार आहे. म्हणूनच तुमची तंतरलीय…

उद्धव ठाकरे तुम्ही नक्कीच आत्मचरित्र लिहायला हवं… त्यात खालील घोटाळे कसे केले त्यावरही लिहा… म्हणजे मराठी माणसाला तुम्ही कसं लुटलं ते ही कळेल..आणि हो, लवकरच ज्या आसनाची गरज तुम्हाला लागणार आहे ते शवासन ही शिकून घ्या उद्धवजी…. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है..हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलयं जे तुम्ही आणि तुमच्या बगलबच्च्यांनी पाहील आहेचं..म्हणून सांगतोय आमच्या देवेंद्रजींच्या नादी लागू नका असा इशारा वाघ यांनी दिला आहे.