‘पटलं तर घ्या विथ जयंती’ मधून होणार आपल्या आवडत्या कलाकारांची पोलखोल !

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या आठवणी आपण नेहमीच ऐकतो. वाचतो. मात्र त्यांच्या आयुष्यात असेही काही किस्से असतात, जे अजूनही त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचलेले नसतात. कलाकारांच्या अशाच अनेक गोष्टी, किस्से, रहस्यं प्लॅनेट मराठी चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. लवकरच एक नवा शो आपल्या भेटीला येणार असून ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ (Patal Tar Ghya with Jayanti) असं या शोचं नाव आहे. यात सेलिब्रेटींसोबत दिलखुलास गप्पा, काही न ऐकलेले किस्से, मजेशीर खेळ यांसारख्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेक्षकांना ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा शो प्लॅनेट मराठीच्या ओटीटीवर विनामूल्य पाहता येईल.

या शोचा हा पहिला सिझन असून या सिझनमध्ये एकूण ८ एपिसोड्स आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’चा पहिला एपिसोड येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून दर शुक्रवारी या शोचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येतील. पहिल्या एपिसोडमध्ये अभिजीत पानसे (Abhijeet Panse) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आपल्या भेटीस येणार आहेत. तर पुढील एपिसोड्समध्ये अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar), सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), ओम राऊत (Om Raut), प्राजक्ता माळी (Prajakta Mali), यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत गप्पा रंगणार आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. चित्रपट, वेबसीरिज सोबतच यावर्षी अनेक फिक्शनल, नॅान फिक्शनल शोज, टॅाक शोज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा त्याचाच एक भाग आहे. या शोमधून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीबाबत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळणार आहेत.’’

या शोचे सुत्रसंचालन जयंती वाघधरे करणार असून त्या म्हणतात,  गेल्या १२ वर्षांपासून मी मनोरंजन क्षेत्रात पत्रकार म्हणून काम केलं आहे. अनेक मराठीतील, बॅलिवूडमधील बड्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं, की स्वतःच्या नावावर त्याचा एक शो असावा आणि ही संधी मला प्लॅनेट मराठीवरील या शोच्या माध्यमातून मिळाली. दर शुक्रवारी प्लॅनेट मराठीच्या ओटीटी ॲपवर ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या शोमधून मी तुमच्या भेटीस येणार आहे.