शिवसेनेचे 14 खासदारही बंडाच्या तयारीत? वेगळा गट म्हणून मान्यता देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी करणार?

मुंबई – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

यातच आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेतील (Shivsena) खासदारही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाणार असल्याची चर्चा राजकारणात होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदारही बंडाच्या तयारीत असल्याचं समजतं.

द हिंदू वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसेनेचे 14 खासदार बंडाच्या तयारीत आहेत. त्यासाठी 13 किंवा 14 जुलै रोजी हे खासदार वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांच्याकडे मागणी करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या काही खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केलीय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांची बैठक बोलावली असून त्यात द्रौपदी मूर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा घोषित करण्याची शक्यता आहे.