एका जागी बसणं जमलं नसतं म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली; पवारांचे स्पष्टीकरण

Sambhajinagar – राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक (Presidential election) लढवावी, असा भाजप (BJP) वगळता देशातील राजकीय पक्षांनी आग्रह केला होता. पण अखंड एका जागी बसणे, लोकांत न मिसळणे, हे जमले नसते. त्यामुळे राष्ट्रपतिपदाचा उमेदवार झालो नाही,’असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी (ता. १०) येथे माध्यमांशी बोलताना दिले.

पवार म्हणाले, मी उमेदवारी स्वीकारावी म्हणून सर्व पक्षांनी आग्रह केला होता. काही गणितेही मांडून दाखवली होती. मात्र, माझ्यासह सहकाऱ्यांचे मत होते की, उमेदवारी स्वीकारू नये, असा त्यांनी सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. आता या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल, याकडे लक्ष देत आहोत. या संदर्भात दिल्लीत दोन बैठकीही घेतल्या असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जर यामध्ये यश आले असते तर माझ्यासारख्या माणसाला अखंड एका ठिकाणी बसणे, कुठेही न जाणे, लोकांशी सु-संवाद न ठेवणे आदी गोष्टी त्रासदायक झाल्या असत्या. त्यामुळे हा आपला रस्ता नाही. त्यामुळे उमेदवारी नाकारली असल्याचे त्यांनी सांगितले.