आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी शिंदे-फडणवीसांसाठी काम करतील; सदावर्तेंची मोठी घोषणा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याचा (Sharad Pawar House Attack) आरोप असणाऱ्या ११८ राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) शुक्रवारी पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानंतर एसटी कामगारांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुंबईत मोठी घोषणा केली. आगामी निवडणुकीत ‘कष्टकरी जनसंघ’ या त्यांच्या एसटी कामगारांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. तसेच पुढील निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी शिंदे-फडणवीसांसाठी काम करतील, असं सांगितलं.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना दोन गोष्टी अवगत केल्या. त्यांना सांगितलं की, कष्टकरी जनसंघ सर्वात बलशाली संघ आहे. तसेच आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसाठी काम करतील.

या निर्णयाने आम्ही भारावून गेलो आहोत. आता त्याच आझाद मैदानावर ५० हजार कष्टकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल. त्या मेळाव्याला शिंदे आणि फडणवीसांनी उपस्थित रहावं. दोघांनीही आम्हाला त्यासाठी होकार दिला आहे, असंही गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं.