अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

Ajit Pawar- माजी एखादी गोष्ट पटली नाही तर विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे परंतु आज काय पहात आहे. मला डेंग्यू झाला तर मला राजकीय आजार झाला अशी चर्चा होते अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा आज पार पडली.

तुम्ही कामाच्या बाबतीत टेंशन घेऊ नका… आपलं नाणं खणखणीत आहे…असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला यावेळी दिला.

मावळ्यांना सोबत घेऊन ही रायगड राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली. त्यानुसार सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न सुटले पाहिजे असे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे असेही अजित पवार म्हणाले.

पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. या जिल्ह्याला नगर, पुणे जिल्हा जोडला जातो. इथल्या पर्यटनाला चालना दिली तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या जात आहेत. सर्व घटकांना अधिकार देण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून करत आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही साधूसंत नाही. अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. वेगवेगळे पक्ष इतर पक्षासोबत जातात. आमची विचारधारा स्पष्ट आहे. अल्पसंख्याक, दलित व कुठल्याही समाजाला न दुखावता त्यांनी गुण्यागोविंदाने रहावे असा आमचा प्रयत्न आहे. आज राज्यात वेगळे चित्र आहे. प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, तेढ निर्माण होता कामा नये ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगतानाच सर्वांना वाटत आहे आरक्षण मिळाले पाहिजे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुणावर अन्याय होणार नाही. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता संधी दिली जाईल अशी भूमिका सर्व पक्षांनी व्यक्त केली असल्याचे अजित पवार म्हणाले.

कोकणातील निसर्गाच्या देणगीला धक्का लागू नये असा प्रयत्न आमचा आहे. सह्याद्रीच्या द-या खो-यात दरडी कोसळतात त्यासाठी दरडप्रवण भागाला मदत करण्याची भूमिका घेतली तशी मदतही देत आहोत. महायुतीचा प्रयत्न हा आहे की, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. विरोधात राहून काम करता येणार आहे का? म्हणून आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला असेही अजित पवार यांनी सांगितले.

सुनिल तटकरे यांना रायगडमध्ये संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे. इथे तीन पक्षांची ताकद असताना इथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली आहे याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.

दरडप्रवण भागात कोकणात चार वेळा नैसर्गिक संकट आले. यावर ठोस निर्णय झाला पाहिजे यासाठी केंद्रसरकारच्या मदतीने चार हजार कोटीचा कार्यक्रम घेतला आहे. आपल्या कामाचा फायदा पक्षाला व्हावा. उद्योग इथे यावेत असा प्रयत्न आहे. अनेक लाख नोकऱ्या दिल्या आहेत. विरोधाला विरोध ही भूमिका माझी नाही आणि कधीही नव्हती आणि असणार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आम्ही महाराष्ट्रात काय करु पहात आहोत हे शिबीरातून राज्यातील जनतेसमोर आणणार आहोत असेही अजित पवार यांनी सांगितले. मरीन ड्राईव्ह इथे मराठी भाषा भवन उभे करत आहोत. मराठी भाषा टिकली पाहिजे तसे मराठी फलकही लागले पाहिजे असे कोर्टाने आदेश दिले आहेत. माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस कामानिमित्त आला तर तिथे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असे काम आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत. न्हावा – शेवा रस्ता नवीन वर्षात होत आहेत.केंद्रसरकारच्या माध्यमातून नवीन उद्योग, काम कसे राज्यात येईल असा प्रयत्न करत आहोत असेही अजित पवार म्हणाले.

राजकीय भूमिका मांडत असताना शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन आपली युती झाली आहे. राजकीय परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो. यातून एकही पक्ष सुटलेला नाही. येणार्‍या नवीन वर्षात सतत लोकांसमोर नम्रपणे संवाद साधावा लागणार आहे. लोकांच्या कामासाठी आम्ही बांधील आहोत असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-