मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, ठाण्यातल्या ११ सदनिका जप्त!

ठाणे – आज ईडीनं मोठी कारवाई करत प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत.

पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत.

महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष पुन्हा ताणला जाणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई केली गेली आहे का, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ईडीनं केलेल्या या कारवाईमुळे श्रीधर पाटणकरांना मोठा धक्का बसला आहे. ईडीनं केलेली ही कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठीही मोठा धक्का मानली जाते आहे. नेमक्या या सगळ्या प्रकरणावरुन आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकऱणावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना रात्री झोप लागणार नाही, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.