राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

मुंबई – राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा, जनतेला आनंद देणारा आणि विरोधकांचा आनंद हिरवणारा असा हा अर्थसंकल्प (Budget) असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे.

या अर्थसंकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (CM Eknath Shinde) यांचे अभिनंदन करुन सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे. अमृत काळाचं हे प्रथम वर्ष आहे; मा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेनुसार भारताला विश्वकप्तान बनविण्यात महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलरचा सहभाग नक्की असेल, या दिशेने नेणारा हा संकल्प आहे.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की , आज मांडलेल्या अर्थ संकल्पात शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक, या सर्वच बाबींचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्याकरीता महासन्मान योजना, अंगणवाडी सेविकाना मानधन वाढ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात भरीव वाढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन, महिलांसाठी लेक लाडकी योजना निश्चितच दिलासा देणाऱ्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी 350 कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.